राज्यात रेशन कार्ड असलेल्या लोकांसाठी एक नवी आणि महत्त्वाची बातमी आली आहे. आता प्रत्येक रेशन कार्डधारकाला आपला राहण्याचा पुरावा (जसं की, आधार कार्ड, विजेचं बिल, भाडे करार वगैरे) द्यावा लागणार आहे. जर हा पुरावा दिला नाही, तर रेशन कार्ड रद्द होऊ शकतं.
रेशन कार्ड म्हणजे काय?
रेशन कार्ड हे एक सरकारी ओळखपत्र आहे. गरीब आणि गरजू लोकांना याच्या मदतीने मोफत किंवा कमी पैशात धान्य (जसं की तांदूळ, गहू, साखर) मिळतं. याशिवाय इतर सरकारी योजना जसं की वीज, घर, गॅस यासाठी देखील याचा उपयोग होतो.
सरकार काय करत आहे?
सरकारने १ एप्रिलपासून ३१ मेपर्यंत एक जाचक तपासणी मोहीम सुरू केली आहे. यामध्ये राज्यातील सगळ्या अंत्योदय, केशरी आणि शुभ्र रेशन कार्डांची तपासणी केली जाणार आहे.
कोणते पुरावे द्यावे लागतील?
तुमचं रेशन कार्ड सुरू ठेवण्यासाठी खालीलपैकी कोणताही एक राहण्याचा पुरावा द्यावा लागेल:
- आधार कार्ड
- विजेचं बिल
- भाड्याची पावती
- बँकेचं पासबुक
- गॅस कनेक्शन पावती
- फोन किंवा मोबाइल बिल
- वाहन परवाना
- मतदार ओळखपत्र
अर्ज कुठे करायचा?
तुमच्या गावातील रस्त भाव दुकानात (जिथून धान्य घेता) जाऊन तिथे एक फॉर्म भरावा लागेल. त्यात तुमचं नाव, पत्ता, रेशन कार्ड नंबर वगैरे माहिती द्यावी लागेल. फॉर्मसोबत वरीलपैकी कोणताही एक पुरावा जोडावा लागेल.
पुढे काय होणार?
- दुकानदार हा फॉर्म पुढे सरकारी कार्यालयात देईल.
- सरकारी अधिकारी हे सर्व अर्ज तपासतील.
- ज्यांनी पुरावा दिला असेल त्यांची वेगळी यादी होईल.
- ज्यांनी पुरावा दिला नसेल, त्यांना १५ दिवसांची संधी दिली जाईल.
- या वेळेतही पुरावा न दिल्यास, रेशन कार्ड रद्द केलं जाईल.
महत्त्वाच्या सूचना
- एका घरात दोन रेशन कार्ड असू नयेत.
- परदेशी नागरिकांना रेशन कार्ड दिलं जाणार नाही.
- काही खास परिस्थितीत दोन कार्ड लागल्यास तहसीलदार किंवा वरिष्ठ अधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागेल.